Mumbai

आंगणेवाडीतील प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटींचा निधी-पालकमंत्री रविंद्र चव्हाण

 मुंबई, दि. 9 :- कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील  भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार आहे. आंगणेवाडीतील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला.

            या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये १० कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आंगणेवाडी परिसरातील नागरी सुविधा व विकास कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसराचा कायापालट होणार आहे.

            आंगणेवाडी मधील सोयी-सुविधांसाठी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये काळसे कट्टा रस्तामालवण-बेळणा रस्तागोळवण-पोईब रस्ताओझर-कांदळगाव मागवणे मसुरे-बांदिवडे-आडवली-भटवाडी रस्ताराठीवडे-हिवाळे-ओवळीये-कसाल-ओसरगाव रस्ताचौके-धामापूर रस्ता व कुमामे-नांदोस-तिरवडे-सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचा यामध्ये समावेश असून या रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी मंजूर केला आहे.

            आंगणेवाडी हे मालवण तालुक्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून तेथील भराडीदेवी हे सुप्रसिद्ध आहे. दरवर्षी भराडीदेवीच्या यात्रेकरिता मुंबईसह महाराष्ट्रातून दरवर्षी सूमारे ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील तारकर्ली व देवबाग येथील समुद्र किनारे व प्रसिद्ध सिंधुदूर्ग किल्ला येथे भेट देण्याकरिता ऑक्टोबर व मे महिन्यांच्या दरम्यान पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेले हे रस्ते आंगणेवाडीला जाणारे प्रमुख रस्ते असल्याने या रस्त्यांवरुन वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच हे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी घेतला आहे.  तसेचबिळवस आंगणेवाडी रस्ता हा ४.३०० कि.मी. लांबीच्या या रस्त्याचे काम सुद्धा आता लवकरच सुरु होणार आहे. तसेचचौके आमडोस माळगांव मांगवणे आंगणेवाडी रस्ता हा एकूण २२.२०० कि.मी. लांबीच्या रस्त्याची सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यामध्ये दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लवकरच येथील सर्व रस्ते सुसज्ज व दर्जेदार होणार आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापूर-चंदगड-तिल्लारी दोडामार्ग रस्त्यावरील मोठ्या धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला असून या कामासाठी सुमारे २ कोटीच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

            आंगणेवाडीतील भराडीदेवीची यात्रा दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी मार्चमध्ये होत असते. या यात्रेच्या पूर्वी या प्रमुख रस्त्यांची कामे व येथील मंदिर परिसर सुसज्ज करण्याच्या दृष्टीने विभागाला आदेश देण्यात आले आहेत. आंगणेवाडीतील विकासकामे, महत्त्वपूर्ण सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही.  पुढील वर्षी आंगणेवाडी यात्रेच्या पूर्वीच सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *