जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये १०७० पाणी पुरवठा योजना मंजूर-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

रायगड जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत १०७० नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४५९ योजनांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून ३९७ योजना प्रगती पथावर आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी आज विधानसभेत दिली.
रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सन २०२२ मध्ये उन्हाळ्यात पाणी पुरवठा मुबलक होण्यासाठी ३७ टँकरद्वारे ५८ गावे आणि २४५ वाड्यांत पाणी पुरवठा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील या योजना गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, समीर कुणावार, जयकुमार रावळ यांनी सहभाग घेतला.