Trending

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाचे मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते उदघाटन

दूरदृश्यप्रणालीद्वारे समाज कल्याणचे अनेक उपक्रम लोकार्पित

मुंबई, दिनांक २६/०६/२०२३ :- राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या चेंबूर येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य राहुल शेवाळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, समाज कल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आणि समाज कल्याण, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार प्रामुख्याने उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्हयाअंतर्गत विभागीयस्तरावरील मागासवर्गीय १००० मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या वसतिगृहाचे बांधकाम BOT तत्त्वावर सुरु आहे. त्यापैकी २५० मुलींचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून मुंबईमध्ये विदयार्थीनींना सुविधा मिळावी, यासाठी आरक्षणाचे जनक, समतेचे पुरस्कर्ते लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाचे मुंबई उपनगर जिल्हयामध्ये ४ वसतिगृह आहेत त्यापैकी एकच वसतिगृह मुलींसाठी उपलब्ध होते, मुंबई महानगरामध्ये महाराष्ट्रातुन सर्व जिल्हामधील शिक्षणासाठी येणाऱ्या विदयार्थीनींना या वसतिगृहाचा भरपुर फायदा होणार आहे. या वसतिगृहामध्ये विदयर्थ्यांनींना चांगले स्वादिष्ट भोजन, शैक्षणिक सुविधा, सुरक्षित निवासाच्या सोयीसोबतच खालीलप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच याच परीसरामध्ये ७५० मुलांच्या वसतीगृहाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे, हे ही वसतीगृह जानेवारी २०२४ पुर्वी पुर्ण करून विदयार्थ्यांना वापरण्यास उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. याप्रकारे या नवीन वसतिगृहे व जुनी वसतिगृहे मिळुन पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मुंबई उपनगर जिल्हयात १३०० मुले व ३५० मुली असे १६५० मागासवर्गीय विदयार्थ्यांची सोय सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तविक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये दूरदृश्यप्रणालीद्वारे वाशिम जिल्हयातील मंगरूळपीर येथे मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे करण्यात आले. यामध्ये 100 मुलींची निवास व शिक्षणाची व्यवस्था या मंगरूळपीर गावामध्ये होणार आहे.

तसेच बार्टी अंतर्गत येरवडा संकुल पुणे येथील UPSC चे निवासी प्रशिक्षणाचे उदघाटन छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीनिमित्त ( सामाजिक न्याय दिन) सदर दुरदृष्य प्रणालीने करण्यात आले. यु.पी.एस.सी. ची तयारी करणा-या अनुसुचित जातीच्या ७० उमेदवारांना (यापैकी ३०% मुली) यशदाच्या धर्तीवर निवासी प्रशिक्षण सुरु करण्याचे प्रयोजित आहे. त्यानुसार राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (SIAC), मुंबई कडुन सामाइक प्रवेश चाळणी परिक्षा दिनांक ०४ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आली. यातुन मेरिटनुसार ७० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. सदर ७० उमेदवारांना येरवडा संकुल पुणे येथे यु.पी.एस.सी. चे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता निवासाची, प्रशिक्षणाची व आभ्यासीकेची संपुर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना दरमहा भोजन व इतर खर्चासाठी विद्यावेतन रुपये ६०००/- इतके देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ११ महिन्यांचा असेल. प्रशिक्षणाकरिता यशदाच्या धर्तीवर पुण्यातील नामवंत व्याख्यांत्यांना व्याख्यांनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.

त्याच प्रमाणे राज्यामध्ये सर्व महाविदयालयांमध्ये स्थापन समान संधी केंद्रांचे समन्वयन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी याचे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे. या ॲप्लिकेशन उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मानले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत द्वारे झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *