आदिवासी पाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

आदिवासींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.
पालघर जिल्ह्यातील दाभोन गावातील कांढोलपाड्यातील पाणीटंचाई संदर्भात विधानसभा सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.
पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील म्हणाले, दाभोण गावाची लोकसंख्या 109 आहे. येथे चार हातपंप बसविण्यात आले होते. मात्र त्यातील एक नादुरूस्त होता. या वाडीतील पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी जलजीवन अभियानात हे गाव घेण्यात आले आहे. बारापोखरणच्या योजनेचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ही योजना नवीन योजनेत बसविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या योजनेसाठी अधिकच्या निधीची तरतूद करता येईल का सर्व बाबींची पडताळणी केली जाईल. या योजनेसंदर्भात निर्णय घेताना मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा केली जाईल. आदिवासी पाड्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.