नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळविणे आवश्यक-कोंकण विभागीय कृषी सहसंचालक

नवी मुंबई दि.21 :- कोंकण विभागात होणारा सततचा अवकाळी पाऊस,अतिवृष्टीमुळे या विभागातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्रा बाबत नुकसानाची माहिती घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक असल्याचे कोंकण विभागीय कृषी सहसंचालक यांनी कळविले आहे.
कोकण विभागातील रायगड व पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना ही भारतीय कृषी विमा कंपनी तर ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स क.लि. या विमा कंपन्याकडून राबविण्यात येत आहे. कोंकण विभागात सध्या भात, नाचणी व उडीद पिकांच्या कापणीला सुरुवात झाली असून सततचा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते. पिक नुकसानीबाबतची पूर्वसूचना केंद्र शासनाने विकसित केलेल्या Crop Insurance App किवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालये, विमा कंपनीचा ई-मेल, संबंधित बैंक किंवा कृषी/ महसूल विभाग या द्वारे देण्यात यावी. रायगड व पालघर जिल्हयातील शेतकऱ्यानी भारतीय कृषी विमा कंपनी (टोल फ्री क्र.18004195004) तर ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि(टोल फ्री 18002335555) या विमा कंपन्याच्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा. पीक कापणी करून सुकण्यासाठी ठेवलेले असताना कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत(14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पाऊस यापैकी जे कारण असेल ते नमुद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवतांना योग्य ती खबरदारी घेऊनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसान पूर्वसूचना विहित कालावधीत नोंदवावी असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. अंकुश माने यांच्याकडुन करण्यात येत आहे.