Palghar
जनावरांमधील लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सतर्कता बाळगावी

पालघर दि. 30 :: गुजरात राज्यातील पशुधनामध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. गुजरात राज्याची सीमा पालघर जिल्ह्याला लागून असल्यामुळे सदर रोगाचा प्रादुर्भाव पालघर जिल्ह्यातील पशुधनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लम्पी त्वचा रोग जनावरातील विषाणूजन्य आजार आहे. लम्पी त्वचा रोगामध्ये जनावरास तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोके, मान, पाय छाती पाठ, कास इ. भागावरील त्वचेवर 1 ते ५ से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. जनावराची भूक व तहान मंदावत जाते व दुध उत्पादन कमी होते. सदरील रोगाचा प्रसार माश्या, गोचीड यांच्या मार्फत एका जनावाराकडून दुसऱ्या जनावरांना होतो.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये कलम ४ मधील तरतुदीनुसार “प्रत्येक पशुपालक किंवा इतर कोणतीही व्यक्ती, अशासकीय संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, कोणत्याही प्राण्याचा प्रभारी यांना पशुधनामध्ये लम्पी त्वचा रोगाची लागण झाली आहे असे निदर्शनास आल्यास त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला वस्तुस्थिती कळवावी. व ग्रामपंचायत प्रभारी यांनी जवळच्या उपलब्ध पशुवैद्यकांना लेखी कळविण्यात यावे.
सर्व पशुपालकांना कळविण्यात येते की जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवण्यात यावा. जनावरांवरील माश्या व गोचीड निर्मुलन करण्यात यावे त्याकरिता कीटक नाशकांचा जनावारंवर, गोठ्यात व परिसरात वापर करण्यात यावा. पालघर जिल्ह्यातील पशुधनामध्ये लम्पी त्वचा रोगाकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणुन सतर्कता बाळगण्यात यावी. असे आवाहन , जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे, यांनी केले आहे.