Succes Story

महाराष्ट्राची राष्ट्रीयत्वाची परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या -राज्यपाल आर.एन.रवी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व स्वातंत्र्यचळवळीतील महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण असून महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या’, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी आज  येथे  केले.

             ‘पुढचे पाऊल’संस्थेच्यावतीने आयोजित सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या सत्कार समारंभात विचार मांडतांना आर.एन.रवी यांनी या भावना व्यक्‍त केल्या. श्री. रवी म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा देशभर विशेष सन्मान केला जातो. मुळात महाराष्ट्राला थोरपुरुष, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आदिंची गौरवशाली परंपरा आहे त्यामुळे राज्याच्या मातीतून  भारतीय प्रशासकीय सेवेत येणारे हे अधिकारी आपल्या कार्याचा ठसा उमटवितात. याचा देशाला आभिमान असल्याचेही श्री रवी म्हणाले. राज्याची हीच परंपरा पुढे घेवून जातांना प्रशासन व जनता यामध्ये उत्तम सेतू बनून कार्य करा व त्यासाठी भारतदेश समजून घ्या असेही त्यांनी सांगितले.

         श्री. रवी यांनी यावेळी उपस्थितांना आरोग्याची काळजी, वाचन व अभ्यासवृत्ती वृद्धिंगत करणे, आर्थिक स्वावलंबन  तसेच  आध्यात्मिकशक्ती  यांचा उचित समतोल राखण्याविषयीही मार्गदर्शन केले.

         दिल्ली स्थित मराठी अधिका-यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आज येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले. एकूण तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या  शेवटच्या  सत्रात राज्यपाल आर.एन.रवी  यांच्या हस्ते व लोकपाल सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डी.के. जैन,पुढचे पाऊलचे संस्थापक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे , परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव विश्वास संपकाळ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय भूमी पत्तन प्राधिकरणाच्या सदस्य (वित्त) रेखा रायकर यांच्या उपस्थितीत सनदी सेवा उर्त्तीण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

                                               गुणवंतांचा गौरव

           या कार्यक्रमात संदीप शिंदे, प्रशांत बाविस्कर,रणजित यादव,ओंकार शिंदे,अक्षय प्रकाशकर,पवन खाडे,  निरंजन सुर्वे, शंतनू मलानी, यश काळे, अर्जित महाजन,विशाल खत्री,रोहन कदम,नितीश डोमळे, स्वप्नील सिसले, अजिंक्य माने, अभिजित पाटील, देवराज पाटील, शुभम भोसले, पद्मभूषण  राजगुरू, गिरीष पालवे या सनदी सेवा उत्तीर्ण उमेदवरांचा सत्कार करण्यात आला.

             तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या पहिल्या  सत्रात  उत्तीर्ण उमेदवारांनी  स्पर्धा परीक्षेची व अभ्यासाची तयारी या विषयी अनुभव कथन केले. तसेच, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परिक्षेविषयी  उपस्थित तयारी  करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. दुसऱ्या सत्रात उत्तीर्ण उमेदवरांनी  परीक्षार्थींना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीविषयी मार्गदर्शन केले.  दिल्लीच्या विविध भागात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

         पुढचे पाऊल संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे हे चौथे वर्ष आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *