Palghar

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पालघर दि. 10 : केंद्र व राज्य शासनाव्दारे आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात या योजना आदिवासी समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठाणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात तसेच वाडा येथे कातकरी समन्वय समिती मार्फत कातकरी समाजाचा भव्य सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.

वसंतराव पटवर्धन यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त करुन त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम न करता जव्हार सारख्या दुर्गम क्षेत्रामध्ये येऊन आदिवासी बांधवांची सेवा केली. त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळत आहे. अशप्रकारे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास केल्यास आपल्या भागाचा योग्य विकास होईल असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते वसंतराव पटवर्धन यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच मुकबधिर विद्यालयामध्ये पाहणी करुन विद्यार्थ्यांची विचारपुस केली. स्वर्गीय वसंतराव पटवर्धन यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आपले संपर्ण आयुष्य खर्च केले आहे. त्यांचे हे काम खंडीत न होता सर्व समाजाने त्यांचे कार्य पुढे न्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार राजेंद्र गावीत, आमदार सुनिल भुसारा, श्रीनिवास वनगा, जव्हार नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, उपविभागीय अधिकारी धनाजी तुळसकर, वाडा तहसिलदार उध्दव कदम, पुरुषोत्तम आगवन, श्रीमती सुनंदा पटवर्धन तसेच प्रगती प्रतिष्ठाणाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. बांबू व्यवसायासाठी शासनाने जमिन उपलब्ध करुन दिली आहे. या व्यवसायामधून यावर्षी बांबूच्या राख्या मोठ्या प्रमाणात निर्मिती करून विक्री करण्यात आल्या. या व्यवसायातून हजारो रोजगार निर्माण झाले आहेत. अशा प्रकारे वनसाधन संपत्तीचा योग्य वापर केल्यास आपल्याला गावातच रोजगार उपलब्ध होईल व स्थलांतराची समस्याही सुटेल. असा विश्वासही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. भुमिहीनासाठी भुमि व ज्यांना घरे नाहीत अशा व्यक्तीला स्वत:ची हक्काची घरे मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. गावांतील स्थलांतर थांबवायचे आहे यासाठी गावामध्ये रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे. समाजा विषयी आपले दायित्व आहे. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये जागृत होणार नाही. तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. शासन आपल्या स्तरावर विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करत आहे. असे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रगती प्रतिष्ठाणाच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *