Pune

महापालिकेची सुरक्षा आता तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे महापालिकेचा स्तुत्य उपक्रम

पुणे महापालिकेने (Municipal Corporation) सुरक्षा रक्षक म्हणून दहा तृतीयपंथीयांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आहे. देशाला नवा सामाजिक पायंडा घालून देण्यात अग्रेसर असणारे शहर म्हणजे पुणे. समाजात अनेक सकारात्मक क्रांतिकारी बदल घडवण्याची सुरवात याच शहरातून झाली. शहरातील तृतीयपंथीयांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतलाय.

पुणे महापालिकेच्या (Municipal Corporation) मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी तनुश्री भोसले ही काही दिवसांपूर्वी शुभम भोसले होती. पण पुढचं आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचं तिनं ठरवलं आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून ती पुरुषाची स्त्री बनली. पण पुढे नोकरीचं काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिचा हा प्रश्न पुणे महापालिकेने सोडवला आहे. तिच्यासारख्या दहा तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक म्हणून काम द्यायचं पुणे महापालिकेने ठरवलं आहे.

महापालिकेत २५ तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यापैकी दहा तृतीयपंथीयांना आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते नियुक्त पत्रक देण्यात येणार होते. मात्र काल आयुक्त शहरात नसल्याने हे नियुक्त पत्रक देण्यात आले नाहीये. या दहापैकी पाच तृतीयपंथीयांना मुख्य इमारतीमध्ये तर इतर पाच जणांना महापालिकेच्या शहरातील इतर वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये नेमण्यात आलं आहे.

पुणे महापालिकेने उचललेलं हे पाऊल पाहून इतरही अनेकजण या तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढं येतील असं त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना वाटत आहे. दरम्यान, उपजीविकेसाठी तृतीयपंथीयांना कामं मिळताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा यांना काम देण्यासाठी लोक नकारच देतात. पर्यायाने तृतीयपंथीय समाज पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळं महापालिकेने केलेल्या या प्रयोगाचं अनुकरण इतर संस्था आणि महापालिकांना देखील करता येणार आहे.

तृतीयपंथीयांच्या वेगवेगळ्या अधिकारांसाठी अनेक संस्था आणि संघटना काम करतायत. मात्र त्यांच्यासाठी त्याहून महत्वाचं आहे ते म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळणं. आता पुणे महापालिकेने तृतीयपंथीयांना संधी देऊन नवा आदर्श घालून दिला आहे. अशा स्वरूपाची कामे करण्याची संधी मिळाल्याने या समाजाकडे पाहण्याचा लोकांच्या दृष्टिकोनात बदल होईल, असं तृतीयपंथीयांना वाटत आहे. आता महापालिकेची सुरक्षाच तृतीयपंथीयांच्या हातात आल्याने समाजात वावरताना कसलाही विचार मनात येणार नाही. असे मत या तृतीयपंथीयांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *