अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाची बैठक आज मुंबईत संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी बंड पुकारले. काही गट शरद पवार यांच्याकडे तर काही जण अजित पवार यांच्याकडे जात आहे. राज्यातील राजकारणात रविवारपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. ते राज्याच्या सत्तेत शिवसेना-भाजपसोबत गेले. मग दुसरीकडे शरद पवार मैदानात उतरले. त्यांच्या गटाकडून बंडखोरांवर कारवाई सुरु झाली. स्वत: शरद पवार राज्याचा दौरा करणार आहे. दुसऱ्याबाजूला राज्यभरात कोणते पदाधिकारी कोणासोबत आहेत? हे दाखवण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांच्या समर्थनार्थ आमदार-खासदारांची 40 हून अधिक प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. शरद पवार कॅम्पने निवडणूक प्राधिकरणाकडे कॅव्हेट दाखल केले असून गटबाजीच्या संदर्भात कोणतेही निर्देश देण्यापूर्वी प्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार या दोन्ही गटाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीसाठी संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत पहुचले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची बस देखील मुंबईत दाखल झाली आहे. शरद पवार यांच्या बैठकीला हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे.
40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे
40 पेक्षा जास्त आमदार अजित पवार यांच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.
सुप्रिया सुळेनी अजितदादांना फटकारलं
‘काही लोकांचं वय झालंय त्यामुळे त्यांनी आशिर्वाद द्यावेत, असं काही जण म्हणाले. का बरं आशिर्वाद द्यावेत. रतन टाटाचं वय काय, सीरम इन्स्टिट्यूट पुनावाला त्यांचं वय काय 84 घेतलं का नाही इंजक्शन. अमिताभ बच्चन वय काय 82. फारुक अब्दुल्ला साहेबांपेक्षा तीन वर्ष मोठा आहे. आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशिर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना फटकारलं.
राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर आता वाय बी सेंटरला शरद पवार यांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे. तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, ठाण्यातील तो पठ्ठा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे असे पक्ष सोडून गेले. अजित पवारांच्या आरोपांवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्यामुळे पक्षाचे नेते पक्ष सोडून गेले, असं त्यांना तसं वाटत असेल. तर ठीक आहे. अजित पवारांबद्दल माझी काहीही तक्रार नाही. माझी तक्रार फक्त एकच आहे. शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी आणि घरी बसावं, ही जी भावना तुम्ही व्यक्त करताय, त्याविरोधात मी उभा आहे.”
“तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं आहे, ते तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे. पण जो कर्तृत्ववान मुलगा असतो, तो आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी सांगतो, तुम्ही काम करत राहा. पण तुम्ही (अजित पवार) तर सगळे मिळून त्यांना निरोपच देत आहात. घरी बसायला सांगत आहात. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, ते घरी बसणार नाहीत.”